अमेरिकेत राहणाऱ्या ५.५ कोटींहून अधिक वैध परदेशी नागरिकांच्या व्हिसाची तपासणी केली जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करता यावेत यासाठी हे केले जात आहे. परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, सर्व अमेरिकन व्हिसा धारकांवर आता सतत लक्ष ठेवले जाणार आहे. जर, नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले तर, त्यांचा व्हिसा रद्द केला जाईल आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल.
व्हिसाधारक जेव्हा अमेरिकेत निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ राहतात, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करतात, गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात किंवा दहशतवादी संघटनेला मदत करत असल्याचे आढळतात, तेव्हा त्यांना अपात्र मानले जाते.
व्हिसा नियम कडक केले!जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. तेव्हापासून, ट्रम्प प्रशासनाचे लक्ष अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरित, विद्यार्थी आणि अभ्यागत एक्सचेंज व्हिसा धारकांना हद्दपार करण्यावर आहे. व्हिसा धारकांची ही पुनरावलोकन प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहील. ट्रम्प प्रशासन व्हिसा अर्जदारांवर सतत निर्बंध लादत आहे. यामध्ये सर्व व्हिसा अर्जदारांना वैयक्तिक मुलाखत देणे अनिवार्य करणे याचा देखील समावेश आहे.
पूर्वी, व्हिसाधारकांची चौकशी अशा विद्यार्थ्यांवर केंद्रित होती, जे पॅलेस्टाईन समर्थक किंवा इस्रायलविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत. परंतु, आता ती आणखी कडक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पुनरावलोकनादरम्यान, सर्व व्हिसाधारकांचे सोशल मीडिया अकाउंट तपासले जातील. त्यांच्या देशांमध्ये त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाला आहे का? त्यांनी अमेरिकेत वास्तव्यादरम्यान कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले आहे का?, हे देखील पाहिले जाईल.
गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट जास्त व्हिसा झाले रद्द! परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट व्हिसा रद्द केले आहेत. या वर्षी जवळजवळ चार पट जास्त विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर, ६ हजारांहून अधिक विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यापैकी बहुतेक प्रकरणे प्राणघातक हल्ला, मद्यपान करून गाडी चालवणे आणि दहशतवादाला पाठिंबा देण्याची होती.
अमेरिकेत मुदतीपेक्षा जास्त काळ राहिल्यामुळे किंवा अमेरिकेच्या कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले. या ६ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४ हजार व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आले. दहशतवादाशी संबंधित समस्यांमुळे सुमारे २००-३०० व्हिसा रद्द करण्यात आले.