सिंधूपालचौक (नेपाळ) : महाप्रलंयकारी भूकंपानंतर नेपाळमध्ये सुरू असलेले मृत्यूचे तांडव आठवड्यानंतरही कायम आहे. नेपाळच्या ग्रामीण भागात अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मृतदेह बाहेर काढणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. ढिगाऱ्याखालील मृतदेहांचा शोध घेऊन त्यांची विल्हेवाट न लावल्यास पुढच्या काही दिवसांमध्ये साथीच्या रोगांनी थैमान घालण्याची भीती वर्तवली जात आहे.आंतरराष्ट्रीय वैद्यकीय बचावपथके त्यादृष्टीने नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहेत. इंटरनॅशनल रेडक्रॉसने या कार्यात आघाडी घेतली आहे. सरकारी आकडेवारीनुसार भूकंपातील बळींच्या संख्येने सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. भूकंपाचे केंद्र असलेल्या गोरखा जिल्ह्यापेक्षाही सिंधूपालचौक येथील मृत्यूचे थैमान अस्वस्थ करणारे आहे. सिंधूपालचौक येथे आतापर्यंत १,८०० मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीन हजार लोक अजूनही बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. सिंधूपालचौकमध्ये मातीच्या घरांची संख्या अधिक असल्याने साहजिकच येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सिंधूपालचौकच्या खालोखाल गंभीर स्थिती काठमांडू जिल्ह्यात आहे. येथील मृतांच्या संख्येनेही हजाराचा आकडा ओलांडला आहे. काठमांडू लगतच्या ग्रामीण भागांमध्ये अजूनही भूकंपग्रस्तांना मदत पोहोचलेली नाही. दांडागाव, कालाबारी, बतासे आणि चिसापाणी ही गावे काठमांडू लगतच्या स्वयंभूपासून अवघ्या साडेपाच ते ७ किलोमीटर परिघात आहेत. ही गावे पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर बचावलेले उघड्यावर जगत आहेत. रात्री थंडीचा जोर वाढत असल्याने त्यांचे हाल होत आहे. बतासे गावात इश्वर राज गिरी या बचावलेल्या २४ वर्षीय तरुणाला ‘लोकमत’ने गाठले. कुटुंबातील तो एकटाच भूकंपातून बचावला. ६ दिवसांपासून कोणीतरी येईल व आपल्याला मदत करेल या आशेवर तो आहे. पण आमच्या गावाकडे कोणीही फिरकलेले नसल्याचे हताश गिरीने सांगितले.
३,००० जण अजूनही बेपत्ता
By admin | Updated: May 2, 2015 04:48 IST