ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २६ - अल्लाची निंदा केल्याबद्दल बिनधास्त व बहुचर्चित पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक व तिचा नव-याला २६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ईश्वराची निंदा करणारा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित करण्यात आल्याबद्दल पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.
मीर शकील-उर-रहमान याच्या मालकीचे असणा-या 'जिओ टीव्ही'वर प्रसारित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान वीणा मलिक व बशीर यांचा नाट्यमय विवाह दाखवण्यात आला व त्यावेळी एक धार्मिक गाणही वाजवण्यात आलं. याप्रकरणी वीणा मलिक, मीर शकील-उर-रहमान , बशीर व कार्यक्रमाची निवेदिका शौष्टा वहीदी या चार जणांना २६ वर्षांचा तुरूंगवास व १३ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या चौघांनीही पवित्र धार्मिक गोष्टींचा अपमान केल्याचे सांगत त्यांना अटक करण्यात यावी असा आदेश न्यायाधीशांनी पोलिसांना दिला आहे. विशेष म्हणजे हे चौघेही आरोपी सध्या पाकिस्तानाबाहेर आहेत. तसेच ज्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे, ते न्यायालय गिलगित-बाल्तिस्तान प्रातांतील असून त्या प्रांताला पाकिस्तानच्या पूर्ण प्रांताचा दर्जा मिळालेला नसून त्या न्यायालयाचे आदेश इतर प्रांतात लागू होत नाहीत. नाही. तसेच त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाची अमलबजावणी होण्याची शक्यता कमीच आहे.