हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना प्रमुख नसल्याने प्रभारीवर कारभार चालवावा लागत आहे. काही विभागांना तर मागील तीन ते चार वर्षांपासून कुणी अधिकारी न मिळाल्याने अशा विभागांचा कारभार ढेपाळला आहे. आता तीन विभागांना का होईना पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कार्यकारी अभियंता म्हणून गौरव चक्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून जगदीश मानमोठे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून आर. डी. कदम यांची नियुक्ती झाली आहे. यापैकी चक्के हे रुजू झाले आहेत. अजूनही जिल्हा परिषदेच्या पंचायत, सामान्य, महिला व बालकल्याण विभागाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिळाला नाही.
त्याचबरोबर समाज कल्याण बांधकाम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा इथे कोणी प्रमुख नसल्याने पदभारावर कारभार सुरू आहे. तर उप शिक्षणाधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेचे रिक्त पदांची हे ग्रहण कधी सुटणार याचे कोडे अजून उलगडले नाही. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी किंवा इतर लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे प्रभारी राज काय नसल्याचे दिसून येत आहे.