हिंगोली : काँग्रेसकडून हिंगोली विधानसभेत तीनदा आमदार राहिलेल्या भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांची काँग्रेसमध्ये होत असलेली घुसमट नवी नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र संयमाचा बांध फुटण्याची स्थिती आहे. एकतर तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर आम्हाला तरी परवानगी द्या, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतल्याने प्रकरण वेगळ्या वळणावर आल्याचे दिसत आहे.
हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसच्या एकसंघतेला मागील काही वर्षांपासून तडा गेला आहे. एका घडीला मनोमिलन अन् दुसऱ्या घडीला दुरावा असे चित्र राहिले. दिवंगत खासदार राजीव सातव आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर या दोन्ही नेत्यांमध्ये हे सातत्याने घडत आले. त्यामुळे पक्ष कार्यक्रम असो की निवडणुका, हा दुरावा स्पष्टपणे दिसून यायचा. एकमेकांचा आदर म्हणा की तोंडदेखलेपणा यातून दोघांनीही थेट दुखावण्याचे वक्तव्य कधी केले नाही, हीच काय ती जमेची बाजू. मात्र या दोघांमधील वादाची झळ त्यांनाच नव्हे, कार्यकर्त्यांनाही बसत आल्याचा मुद्दा नुकत्याच झालेल्या गोरेगावकर समर्थकांच्या बैठकीत समोर आला. एकतर पक्षात आपले स्थान काय? हे कळायला मार्ग नाही. त्यात निवडणुका लढण्यासाठी लागणारे बळ पक्षाच्या माध्यमातून मिळणार नसेल, एकमेकांचे पाय ओढण्याचेच काम होणार असेल तर पक्षात राहायचे कशाला, असा थेट मुद्द्यालाच हात अनेकांनी घातला. दोन्हींचे एकत्रीकरण होण्याची शक्यता आता माळवली आहे. नुकत्याच झालेल्या पक्ष संघटनेतील बदलातही गोरेगावकर गटाला फारसी संधी मिळाली नाही. त्यामुळे आगामी काळातही अशीच होरपळ सोसायची कशासाठी, असा कार्यकर्त्यांचा सवाल होता. त्यापेक्षा वेगळा मार्ग निवडा, आम्ही सोबत आहोत. नाहीतर आम्हाला परवानगी द्या, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला बळ मिळाले नाही, तर पुढे कुणाच्या भरवशावर लढायचे? गटातटाच्या भिंतीआडून एकमेकांवर वार करण्यापेक्षा थेट आमना-सामना करण्याची तयारी असल्याचेही काहींनी बोलून दाखविले.
कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, एवढेच सांगून भाऊराव गोरेगावकरांनी मौन पाळले. मात्र त्यांचे समर्थक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आक्रमकता पाहता आगामी काळात काँग्रेसचा हा गट वेगळा निर्णय घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दोनच पर्याय
काँग्रेसच्या या गटाला आता भविष्यात युती व आघाडी होणार नाही, याच आधारावर नवा पक्ष निवडण्याचा पर्याय आहे. तसेही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हेच दोन पर्याय आहेत. भाजपचा या विधानसभेत विद्यमान आमदार आहे. त्यातही भविष्यात काय गणिते बसतात, याचा अजून ताळमेळ नाही, हे सर्व जण ओळखून आहेत. मात्र एवढी वर्षे काँग्रेसमध्ये काढल्याने गोरेगावकरांचे पाऊल वेगळ्या दिशेने पडेल काय, हाही प्रश्न आहे.