हिंगोली : महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याचे गंठण पळविणाऱ्या चोरट्यालव शोध घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. चोरट्याकडून लंपास केलेले सोन्याचे गंठण व दुचाकी असा ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वसमत शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी अंबिका बापूजी पिटलेवाड दुचाकीने घराकडे जात असताना येथील महामार्गावर एका दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण पळविल्याची घटना ५ मेच्या रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरट्याच्या शोधात होते. या घटनेतील चोरटा तालुक्यातील माळवटा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून चिंतामणी बालाजी नादरे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सोन्याचे गंठण पळविल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून ४६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व ५० हजार रुपये किमतीची एमएच ३८ एस १६७२ क्रमांकाची दुचाकी असा ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गंठण चोरट्यास वसमत शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थागुशा पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, पोउपनि. बालाजी बोके, पोना. संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर सावंत, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.
महिला पोलिसाचे सोन्याचे गंठण पळविणारा चोरटा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST