हिंगोली : घरगुती वापराचे गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता ९१० रुपये ५० पैसे माेजावे लागणार आहेत. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीने स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. शहरी भागात आता प्लॅटमध्ये चुली पेटविण्याची वेळ आली आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने अगोदरच सर्वचजण मेटाकुटीला आले आहेत. इंधर दरवाढीने महागाईत भर पडत असून महिन्याचे बजेट कोलमडत आहे. आता पुन्हा १ सप्टेंबर रोजी गॅस सिलिंडरचे दरही तब्बल २५ रुपयांनी वाढले आहेत. मार्च-एप्रिल महिन्यात केवळ दहा रुपये कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा दिलासा फार काळ टिकला नाही. लगेच जुलै महिन्यात गॅस सिलिंडरचे दर ८६० रुपये ५० पैसे करण्यात आले. त्यानंतर ऑगस्टमध्ये थेट २५ रुपयांची वाढ करण्यात आली. आता पुन्हा १ सप्टेंबर रोजी २५ रुपयांनी वाढ झाली. घरगुती वापराचे सिलिंडर आता ९१० रुपये ५० पैशांना घ्यावे लागत आहे. कोरोनामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांचे गॅस सिलिंडरच्या दरवाढीने डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे. मात्र, शहरी भागात फ्लॅटमध्ये चूल पेटविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
सबसिडी किती भेटते रे भाऊ
गॅस सिलिंडरवर जवळपास मे २०२० पासून सबसिडी मिळणे बंदच झाले आहे. सबसिडीमुळे गरिबांना दिलासा मिळत होता. मात्र, सबसिडी बंदच झाल्यात जमा आहे. हिंगोली शहरातील एका गॅस वितरकाकडे विचारणा केली असता मागील महिन्यापर्यंत ९ रुपये ४५ पैसे सबसिडी जमा होत होती. १ सप्टेंबर रोजी दर वाढ झाली. आता किती सबसिडी मिळेल हे पंधरा दिवसांनीच समजेल, असे त्यांनी सांगितले.
व्यावसायिक सिलिंडरचे दर जैसे थे
जिल्ह्यात ऑगस्टपूर्वी व्यावसायिक सिलिंडर यापूर्वी १६९५ रुपयांना मिळत होते. ऑगस्टमध्ये यात ४ रुपयांनी घट झाली असून १६९१ रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार होते. यामुळे व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी घरगुती वापराचा गॅस सिलिंडर महागल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.
अगोदरच कोरोनामुळे रोजगार मिळणे अवघड बनले आहे. त्यात गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. पंधरा दिवसांत पुन्हा २५ रुपयांनी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. दरवाढीमुळे फ्लॅटमध्ये चुली मांडण्याची वेळ आली आहे.
- चंद्रभागाबाई राऊत
गॅस सिलिंडरचे दर सारखेच वाढत आहेत. त्यामुळे घरखर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे. पूर्वीसारखे जळनही मिळत नाही. त्यामुळे पक्क्या घरात चुली पेटविण्याची वेळ आली आहे.
- कविता पुंडगे
जानेवारी ७२०
फेब्रुवारी ८२०
मार्च - ८४५
एप्रिल - ८३५
मे - ८३५
जून - ८३५
जुलै - ८६०.५०
ऑगस्ट - ८८५.५०
सप्टेंबर - ९१०.५०