हिंगोली : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये अज्ञातांनी २८ मार्चच्या मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास धुडगूस घालून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करत गोंधळ घातला. हा प्रकार साधारण एक तास चालला.
२८ मार्चच्या घटनेनंतर २९ मार्च रोजी सकाळी डॉक्टरांनी या प्रकरणाचा निषेध केला. २८ रोजी मध्यरात्री ३ वाजता सेंटरवर रखवाली करत असलेल्या गार्डला ‘माझी आई कोरोना सेंटरमध्ये आहे. तिला भेटायचे आहे,’ असे म्हणून दोन अज्ञातांनी आत प्रवेश केला. त्यानंतर या अज्ञातांनी कोरोना सेंटरमधील प्रशिक्षित डॉक्टर मंडळींना दमदाटी करत धुडगूस घातला. या प्रकाराविषयी सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर रात्री ३.३० वाजता डॉ. ज्योती पवार या कोरोना सेंटरमध्ये पोहोचल्या. याप्रकरणी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या कानावर ही गोष्ट घातली. धुडगूस घालणाऱ्या अज्ञातांना शिक्षा व्हावी, असे डॉक्टर मंडळीचे म्हणणे आहे.
याप्रकरणी २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता या घटनेचा डॉ. ज्योती पवार, डॉ. राहुल डोंगरे यांनी निषेध केला. यावेळी रात्रपाळीला असलेली डॉक्टर मंडळी उपस्थित होती. २८ मार्च रोजी हा प्रकार घडल्यानंतर डॉ. पवार यांनी शहर पोलिसांनाही याची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी ‘तुम्ही आमच्याकडे रीतसर अर्ज द्या’ आम्ही धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.