कुरूंदा : येथील उपबाजारपेठेमध्ये हळदीची आवक येण्यास सुरूवात झाली असून, जवळपास दीड हजार पोते हळदीची आवक शनिवारच्या बीटमध्ये झाली होती. हळदीला ५ ते ७ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. सरासरी हळद ६ हजार ५०० रुपयांपर्यंत विकली जात आहे.हळदीला घसरलेल्या अवस्थेत भाव असल्याने यावर्षी शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेल्याची शक्यता आहे. वसमत तालुक्यात कुरूंदा भागात सर्वाधिक हळदीचे उत्पादन होते. या भागात इसापूर धरणाचे पाणी आल्यामुळे हळद उत्पादन वाचले असून, मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड झाली. हळदीच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. यावर्षी प्रथमच कोचाच्या भावात मोठी घसरण झाल्याने हळदीचे भाव घसरले होते. सध्या हळदीच्या भावात घसरणच असून नावारूपाला एक ते दोन लाट ७ हजार रुपयांपर्यंत जात आहे. सरासरी ५ हजार ते ६ हजार ५०० हेच भाव हळदीला मिळत आहे. हळदीला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कुरूंद्याच्या बीटमध्ये हळद येण्यास सुरूवात झाली आहे. टप्प्या-टप्प्याने हळद आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
उपबाजारपेठेत हळदीची आवक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:00 IST