वसमत : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी हळदीच्या कोचाला ११ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यावर्षीचा हा सर्वाधिक दर ठरला आहे. हळदीच्या कोच्याला दरात वाढ झाल्याने व बिटात एवढा दर मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.
वसमत मार्केट यार्डात कृषीमालाला चढता दर मिळावा यासाठी सभापती राजेश पाटील इंगोले संचालक मंडळासह विविध उपक्रम राबवत असतात. जास्तीत जास्त खरेदीदार वसमतमध्ये यावेत यासाठी व्यापाऱ्यांनाही सोयी - सुविधा देण्यावर भर दिला जात असतो. त्याचाच परिणाम वसमतमध्ये हळदीची आवक वाढली आहे. हळदीला सर्वाधिक दर ही वसमत बाजार समितीमध्येच मिळत आहे. हळदीच्या कोचाचे उत्पादनही वसमत परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असते. हळदीपेक्षा कोच्याला ज्यादा दर मिळतो. आज कोचा कांडीला ११ हजार रुपये तर काेचा बंडाला १३ हजार रुपये दर मिळाला. दोन वर्षापूर्वी १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत कोचाचा दर गेला होता. यावर्षी मात्र कोचाचे दर घसरले. ६ हजार ते ९ हजार रुपयाच्या आसपास चढ-उतार होत होता. मंगळवारी मात्र वसमत मार्केट यार्डात कोचाला यावर्षीचा हा सर्वाधिक दर ठरला आहे. हळदीच्या कोच्याला कॅन्सरची औषधी व वजन कमी करण्याच्या औषधी तयार करण्यात उपयोग करतात. त्यासाठी औषधी कंपनीकडून या कोच्याला मोठी मागणी असते. हळदीचा कोचा खरेदी करण्यासाठी अहमदाबाद, इंदौर, मुंबई, कलकत्ता आदी भागात व्यापारपेठ आहे. विविध भागाचे खरेदीदार वसमत येथे हजेरी लावत असतात. त्यामुळे कोचाची आवक बाजारपेठेत वाढत आहे.
या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश पाटील इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वसमत परिसरात हळदीच्या कोचाचे उत्पादन व कोचाची औषधी गुणवता पाहता कोचासाठी वसमतमध्ये बाजारपेठ वाढविण्यासाठी बाजार समिती कार्यरत आहे. उत्पादकांना ज्यादा दर मिळावा व खरेदीदारांना दर्जेदार माल मिळावा या दोन्ही बाजूचा विचार वसमत बाजार समिती करत असल्याने वसमत मार्केट यार्डात कृषी मालाला चढ उतार मिळत आहे असे सभापती राजेश पाटील इंगोले यांनी सांगितले.
फोटो नं १२ व १३