लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील शास्त्रीनगर भागामध्ये १ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव सायरन वाजल्यामुळे फसला आहे. मुंबई व नागपुरातुन हिंगोली पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तातडीने धाव घेतल्यामुळे चोरटे पसार झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.शहरातील शास्त्रीनगर भागात पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम आहे. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरटे एटीएम मध्ये घुसले. यावेळी चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरु केला. एटीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक सायरन वाजले. अन् ही माहिती बँकेच्या मुंबई येथील यंत्रणेकडे पोहोचली. मुंबई येथून नागपूर कार्यालयाला संपर्क साधण्यात आला. त्यानंतर नागपुर कार्यालयाने हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला माहिती कळविली. त्यांनी तातडीने शहर पोलीसांना ही माहिती दिली. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ पोहचले. पोलीस आल्याची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेत चोरटे मात्र पसार झाले.दरम्यान, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी या एटीएमला भेट देवुन पाहणी केली. याबाबत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हिंगोलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:47 IST