हिंगोली : मोक्का प्रकरणात फरार असलेल्या नगरसेवक नाना उर्फ नरसिंग नायक याच्यासह तिघांना पोलिसांनी ३० जुलै रोजी दुपारी ताब्यात घेतले. त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात जून २०१९ मध्ये नगरसेवक नाना उर्फ नरसिंग नायक याच्यासह सहा जणांवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश काढले होते. गुन्हा दाखल होताच सर्व जण फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके स्थापन केली होती. अखेर यातील तिघे जण हे उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, साहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा व शहर पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेश गाठत तेथून कैलास मनबोलकर, लक्ष्मण नागरे, भागवत बांगर या तिघांना अटक केली होती. मात्र नगरसेवक नाना नायक, राजकुमार नांगरे, बालाजी सांगळे हे फरारच होते. या तिघांच्या मागावर पोलिसांचे पथक होते. हे तिन्ही फरार आरोपी ३० जुलै रोजी न्यायालयात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांचे पथक न्यायालय परिसरात दाखल झाले. दरम्यान, नाना नायक, राजकुमार नांगरे, बालाजी सांगळे न्यायालयात शरण आल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे मोक्का प्रकरणातील सहाही आरोपींना अटक करण्यात यश आले. दरम्यान, तिघांनाही हिंगोली शहर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.