हिंगोली: मार्च महिन्यांपासून कोरोना आजाराने डोके वर काढले आहे. याच धर्तीवर रेल्वेमंत्र्यांनी कुल्हडमधून चहा मिळणार, अशी घोषणा केली आहे. रेल्वे सुरू झाल्यास त्याची अंमलबजावणी तंतोतंत केली जाणार आहे, असे रेल्वेस्टेशन मास्तर भूपेंद्रसिंग यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात मालसेलू, वसमत, धामणी, नांदापूर, बोल्डा, सीरली, चोंडी, मरसूल अशी जवळपास आठ छोटी रेल्वेस्थानके आहेत. हिंगोली स्थानकावरुन रेल्वे सुरु झाल्यास साधारणत: ३०० कुल्हडमधाून चहा जावू शकतो. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून रेल्वेस्टेशनमध्ये प्लास्टिक कपात चहा दिला जात नाही. प्लास्टिकमधून चहा दिल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कार्यवाही केली जाणार आहे. कोरोना आजार लक्षात घेता सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना जिल्ह्यात हिरयाणा, उतर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या ठिकाणावरुन कुल्हड येत होते. त्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी आणणे बंद केले आहे. परंतु, आज स्थिती वेगळी आहे. कोरोना संसर्ग पाहता कुल्हडमधूनच चहा दिला जाणार आहे, याची काळजी घेतली जाणार आहे.
सध्यातरी पॅसेंजर रेल्वे सुरु नाहीत. त्यामुळे रेल्वेस्टेशनवरील चहाचे दुकानही बंद आहे. मागील दोन महिन्यांपासून तीन एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये अमरावती ते तिरुपती, श्रीगंगानगर ते नांदेड आणि सिकंदराबाद ते जयपूर या एक्प्रेसचा समावेश आहे.
प्रवाशांची घेतली जाणार काळजी
कोरोना संसर्ग लक्षात घेता सर्व प्रवशांची काळजी घेतली जाणार आहे. अजून तरी रेल्वे विभागाने पॅसेंजर गाड्या सुरु करण्याच्या सूचना केल्या नाहीत. ज्यावेळेस पूर्णपणे रेल्वे सुरु होतील त्यावेळेस जिल्ह्यातील दहाही रेल्वेस्टेशनला कुुल्हडमधून चहा देण्याचे सांगितले जाईल. याची अंमलबजावणी केली नाही तर संबंधित चहा दुकानावर कारवाई केली जाईल.
भूपेंद्रसिंग, रेल्वेस्टेशन मास्तर, हिंगोली