येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी किसान युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सचिन भवर, शिवाजी जगताप, शिवाजी मोहळे, आकाश वानखेडे आदी उपस्थित होते. प्रा. गोसावी म्हणाले की, कोणत्याच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही. केवळ वोट बॅंक म्हणून शेतकऱ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर शेतकऱ्यांच्या पोरांनी बोलायला शिकले पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढा उभा केला पाहिजे यासाठीच किसान युवा क्रांती संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. रब्बी हंगामात महावितरणने शेतकऱ्याचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार किंवा वीजजोडणी, तोडणी यामुळे शेतकरी चिंतित आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांबरोबरच फळबागा, भाजीपाला पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यावेळी वसमत तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे, प्रा. उदय कदम, वैभव जाधव आदींची उपस्थिती होती.
महावितरणच्या विरोधात राज्यव्यापी लढा उभारणार : यशवंत गोसावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST