यावेळी जि.प. अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखालील सभेस उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, बाजीराव जुंबडे आदींची उपस्थिती होती. यावेळी जि.प. सदस्य अंकुश आहेर यांनी सुचविल्याप्रमाणे काही ठिकाणच्या कामांमध्ये बदल करण्यात आला. अजित मगर यांनी जुन्याच मुद्द्यांवर पुन्हा एकदा रणकंदन उठविले. वाकोडी येथील पुलाचे काम रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच आरोग्य केंद्राच्याही कामाबाबत पुन्हा एकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. जि.प. सदस्या सुवर्णमाला शिंदे यांनी प्रशासन कामे ऐकत नसल्याचा आरोप करीत महिलांना बोलण्याचीही संधी दिली जात नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. मात्र, बहुचर्चित हाताळा व कोठारीच्या शाळेला आज मंजुरी मिळाली.
घनकचरा व्यवस्थापनावर चर्चा
जलव्यवस्थापन समितीची बैठकही जि.प. अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जि.प. सदस्य अंकुश आहेर यांनी घनकचरा व्यवस्थापनात शासन, ग्रा.पं.चा वित्त आयाेग व मग्रारोहयोतून कामे करताना कोणताच मेळ बसविला जात नाही. मग्रारोहयोच्या वाट्यातील कामे न केल्यास ही योजना बारगळणार आहे. त्यात सूचना द्याव्यात, असे सांगितले. तर वटकळी, कुंभारवाडी, आजरसोंडा, रांजोना, मेथा या गावांचा देखभाल दुरुस्ती आराखड्यात समावेश करण्याची सूचना उपाध्यक्ष मनीष आखरे यांनी दिली.