हिंगोली : पुढील तीन दिवसांत म्हणजे २९ डिसेंबरपर्यंत आकाश स्वच्छ व ढगाळ राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान विभागाने वर्तविला आहे.
कापूस वेचणीच्या अवस्थेत असून, कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापसाचा पालापाचोळा, पऱ्हाट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. तुरीच्या शेंगा भरणे आणि काढणीच्या अवस्थेत असून, वेळेवर पेरणी केलेली तूर काढणीला आली असल्यास पिकाची काढणी करून घ्यावी.
केळी पीक फळ लागण्याच्या अवस्थेत असून, केळीच्या बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी केळीला पहाटे पाणी द्यावे. केळीची प्रत चांगली राहण्यासाठी घडांना झाकून ठेवावे. मृगबाग लागवड केलेल्या केळीच्या बागेत सीगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल १० मि.लि.-स्टीकर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घड बाहेर पडण्याच्या अवस्थेत असेल तर झाडांना काठीचा आधार द्यावा. द्राक्षे पीक फुलोरा अवस्थेत असून, द्राक्ष बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी द्राक्ष बागेला पहाटे पाणी द्यावे. द्राक्ष बागेत रोग व्यवस्थापनासाठी योग्य ते नियंत्रण करावे, असा सल्लाही ‘वनामकृ’ विद्यापीठाचे मुख्य प्रकल्प समन्वय डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.