हिंगोली : जिल्ह्यातील एकूण ८६ गावांमध्ये ४४२ शेतकरी ४५६ एकरमध्ये यशस्वीपणे रेशीम शेती करीत आहेत, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी दिली.
सद्यस्थितीत शासनाच्या आयएसडीएस, आयआरकेव्हीवाय, नादेकृसंप्र मनरेगा या प्रमुख योजनांच्या अनुदानाचा लाभ रेशीम शेतकरी घेत आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये म्हणजे ३१ मार्च २०२१ अखेर जिल्ह्यातील २६८ शेतकऱ्यांनी ८५ हजार ४०० अंडीपुजांचे यशस्वीपणे संगोपन करून ४५ हजार ४१० किलोग्रॅम कोष उत्पादन घेतले असून, त्यातून १ कोटी ३६ लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
मागील आर्थिक वर्षामध्ये ‘आयएसडीएसआय’ या अनुदानाच्या योजनेमधून लाभार्थ्यांना ४७ लाख ३८ हजार ५३१ रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘मनरेगा’ या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही जिल्हा रेशीम विकास कार्यालयाने सांगितले. कोरोना महामारीच्या परिस्थितीत ‘मनरेगा’तून ४२ हजार ४६२ मनुष्य दिवसांची निर्मिती करून मजुरी म्हणून १ कोटी १० लाख ६० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. सन २०२१ - २२ या चालू वर्षात हिंगोली जिल्ह्यातील २३ गावांमधील ३१२ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी केली आहे.
रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा
गत काही दिवसांपासून कोरोना ओसरत चालला आहे. रेशीम शेती करण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास किंवा काही सल्ला हवा असल्यास जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, म्हणजे रेशीम शेतीबाबत माहिती देता येईल, पर्यायाने शंकांचे निरसन होईल.