लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील मोचीपुरा भागातील जीर्ण इमारतीची भिंत अचानक शेजारी असलेल्या घरावर कोसळल्याची घटना २४ जून रोजी सकाळी १० .३० वाजेच्या सुमारास घडली. भिंत पडण्याचा आवाज येताच जीव वाचविण्याच्या आकांताने सर्वांनीच बाहेर धाव घेतल्याचे शाम कुरील सांगत होते.हिंगोली नगरपालिकेच्या वतीने शहरातील जीर्ण इमारतधारक मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. परंतु जीर्ण इमारती पाडण्यास कोणी तयार नाही. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोचीपुरा भागात असलेल्या जुन्या इमारतीची भिंत खचली होती. आणि अचानक रविवारी पहाटे साडेदहाच्या सुमारास जुन्या इमारतीच्या बाजूला असलेल्या शाम कुरील यांच्या घरावर भिंत कोसळली. त्यामुळे घरावरील टीनपत्रे खाली पडले. घरातील साहित्याचे नुकसानही झाले. घरात लहान मुले, पुरूष व महिला होत्या. घराच्या एका बाजूला कोसळलेल्या भिंतीच्या विटा, दगडमातीचे साहित्य पडल्याने पुढील अनर्थ टळला.घटनेसंदर्भात शाम कुरील यांना विचारले असता ते म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून या इमारतीत कोणीच राहत नाही. संबधित इमारतधारक मालकाला याबाबत अनेकदा कळविले. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. घर मालकाला इमारतीची भिंत कोसळल्याचे सांगितले तर ते फोटो पाठवा असे म्हणत असल्याचे कुरील यांनी सांगितले. आता त्यांच्या राहण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जीव वाचविण्याच्या आकांताने घेतली बाहेर धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:15 IST