फिजिशियनच्या (एमडी मेडिसिन) दहा जागा होत्या. यासाठी अर्ज फक्त एक आला आहे. वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदाच्या तब्बल ३९ जागा होत्या. मात्र, अर्ज फक्त ३ आले आहेत. आयुष अर्थात बीएएमएस डॉक्टरांच्या २४ जागा असताना अर्ज फक्त १४ आले आहेत. त्यामुळे सध्या वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या जागा भरणे अतिशय गरजेचे असताना यासाठीच अर्ज येत नसल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी कायम आहे. मागच्या वेळी काही स्थानिकांसह परजिल्ह्यातील डॉक्टरांनी मुलाखतींना हजेरी लावल्यामुळे किमान ५० टक्के तरी जागा भरता आल्या होत्या. यावेळी १० ते १५टक्क्यांच्या पुढेही भरती जाते की नाही, हा प्रश्न आहे.
आरोग्य विभागाच्या इतर जागांसाठी मात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने या पदांसाठी स्पर्धा असल्याचे जाणवत आहे. यात जीएनएमच्या ४३ जागांसाठी ८२ अर्ज आले आहेत. एक्स-रे तंत्रज्ञाच्या ६ जागांसाठी २३ अर्ज आले आहेत. ईसीजी तंत्रज्ञाच्या ६ जागांसाठी १० अर्ज आले. प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या १० जागांसाठी तब्बल ११५अर्ज आले आहेत. औषध निर्माण अधिकाऱ्याच्या १० जागांसाठी २४९ अर्ज आले आहेत. तर सीटी स्कॅन तंत्रज्ञाच्या ४ जागांसाठी ९ अर्ज आले आहेत. या पदांसाठी उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे दिवसभर या उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले. या मुलाखती घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ.नामदेव पवार, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम आदींची उपस्थिती होती.
गर्दीने फुलला परिसर
जुने शासकीय रुग्णालय येथे या मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी सकाळपासूनच उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. महिलांचीही यात मोठी संख्या असल्याचे दिसून आले. दिवसभर या मुलाखती चालल्याने हा परिसर गर्दीने फुलल्याचे पाहायला मिळाले.