जिल्ह्यातील १३ पोलीस ठाण्यांपैकी १० पोलीस ठाण्यांची हद्द एकमेकांच्या कार्यक्षेत्रात गेल्याप्रमाणे विचित्र अशी आहे. पोलीस ठाणे एका तालुक्यात, गाव दुसऱ्या तालुक्यात अशी ही विचित्र परिस्थिती आहे. शिवाय काही ठाण्यांचे व गावांचे अंतर ८० ते ९० किलोमीटरपेक्षा जास्त असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अवघड जात होते. शिवाय तक्रारदारालाही पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचणे जिकिरीचे बनत होते. यामुळे पोलीस प्रशासनाने जवळपास १७० पेक्षा जास्त गावांचे सुसूत्रीकरण प्रस्तावामध्ये ठाणे बदलले आहेत.
कमी अंतरात असणारी गावे नजीकच्या ठाण्याला जोडली गेली आहेत. त्यामुळे आगामी काळात हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नागरिकांना विविध कामांसाठी उपयोगी ठरणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची या प्रस्तावाला संमती मिळाली असल्याने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हा प्रस्ताव जि. प. कडे पाठविला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी हा प्रस्ताव जिल्हा परिषदेत सादर केला आहे. त्याला जि.प.ची मंजुरी मिळाल्यानंतर तो राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी जाणार आहे.