विजेचा लपंडाव; शेतकरी त्रस्त
कळमनुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात पंधरा ते वीस दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वेळोवेळी महावितरण कंपनीला सांगूनही वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. त्यामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई आदी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
बसस्थानकात कचऱ्याचे ढीग
हिंगोली : शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळत आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही काही उपयोग होत नाही. आगारप्रमुखांनी बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
‘नाल्यांवर औषध फवारणी करा’
हिंगोली : शहरातील कापड गल्ली, मंगळवारा, तोफखाना, इंदिरा नगर आदी भागातील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यांवर येत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन नाल्यांवर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
हिंगोली : शहरात मागील काही महिन्यांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी रस्ता काढून दिला आहे. परंतु, पर्यायी रस्त्यावर सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. साधे पायी चालणेही देखील कठीण होऊन बसले आहे. संबंधित विभागाने पर्यायी रस्त्यावर डांबरमिश्रीत गिट्टी टाकून रस्ता मजबूत करावा, अशी मागणी वाहनचालक तसेच नागरिकांनी केली आहे.