जिल्ह्यात थंडी वाढली
हिंगोली : जिल्हाभरात आठवड्यापासून थंड वारे वाहत आहेत. रात्रीच्या वेळी तर कडाक्याची थंडी जाणवत असल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटत आहेत. हरभरा, गहू पिकासाठी थंडी फायदेशीर असल्याचे शेतकरी बोलत आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील किमान तापमान १३ अंश होते. थंडी जाणवत असल्याने अनेक नागरिकांनी कपाटात ठेवलेले उबदार कपडे बाहेर काढले आहेत.
पुलाचे कठडे गायब
हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावरील काही पुलाचे कठडे गायब झाले आहेत. या मार्गावरून पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नसल्याने धोका निर्माण होत आहे. पुलाचे लोखंडी कठडे गायब करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पाणीटंचाईच्या जाणवताहेत झळा
हिंगोली : तालुक्यातील अनेक गावांतील जमिनीतील पाण्याची पातळी खालावत आहे. पाणीसाठे आटत चालल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. जिल्हाभरात चांगला पाऊस झाला असला तरी आतापासूनच पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांची भटकंती वाढली आहे.