२७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास कनेरगाव नाका हद्दीत पेट्राेलिंगवर असलेल्या पथकाला हिंगोली ते वाशिम मार्गावर बोलोरो पिकअप एमएच ३७ जे ११०६ या वाहनातून स्वस्त धान्याचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याकरिता जात असल्याची माहिती मिळाली होती. यावरून आम्ही कन्हेरगाव नाका येथे गोरेगाव टी पाॅईंट येथे पाे.नि. दळवे, फाैजदार गजानन पाटील, कर्मचारी कालवे,इंगोेले, खरबळ येथे थांबले. तेव्हा संबंधित वाहन वाशिम मार्गावरून समोरून येताना दिसले. ते थांबवून चालकास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने गोविंद सुखदेव माने (वय २३ वर्षे ) शिक्षक कॉलनी, हिंगोली असे सांगितले. या वाहनामध्ये काय माल घेऊन जात आहेस असे विचारले असता आतमध्ये तांदळाचे ६० ते ६५ कट्टे आढळले. हा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्यांनी तो माल पप्पू उर्फ आश्राजी सुरेश चव्हाण रा लक्ष्मीनगर, हिंगोली यांचेकडून आणल्याचे सांगितले. तो कनेरगाव येथे सतीश रामदास इंगोले रा आंबाळा, ता.जि.हिंगोली यांचेकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. हा माल रेशनचा असल्याच्या संशयावरून वाहन पोलीस ठाण्यात आणले. तसेच हा पंचनामा पुरवठा अधिकारी किंवा नायब तहसीलदार यांना पंच म्हणून घेऊन करावा, अशी वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर संबंधितांना कळविले. मात्र महसूल विभागाकडून तसे कोणी आले नाही व तक्रारही दिली नाही. यावरून फौजदार गजानन पाटील यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून सुखदेव मानेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST