हिंगाेली बसस्थानकाचे काम २०१७ मध्ये सुरू करण्यात आले; परंतु अजून तरी हे काम पूर्ण झाले नाही. बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतरच प्रवशांची गैरसोय दूर होईल, असे सांगितले जात असले तरी सद्य:स्थितीत मात्र प्रवाशांना धुळीमध्येच बसून बसची वाट पाहावी लागत आहे. बसस्थानकातील गिट्टी पूर्णत: उघडी पडली आहे. एखादी बस वेगाने बसस्थानकात आल्यास धुळीचे लोट उठतात. ही धूळ प्रवाशांच्या अंगावर येते. अशावेळी हातरुमालही वेळेवर सापडत नाही. नवीन बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी पत्र्याचे शेड लावले आहे. प्रवाशांसाठी तात्पुरते बसस्थानक उभारले आहे. विटा रचून व त्यावर दगडी फरशी टाकून प्रवाशांसाठी आसन व्यवस्था केली आहे; परंतु या आसन व्यवस्थेच्या खाली अनेक कुत्रे येऊन बसत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कुठे बसावे? हा मोठा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
सध्या कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाल्याने प्रवासी संख्या वाढत आहे. प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे काही प्रवासी हे चक्क बाजूला असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी जाऊन बसत आहेत. अनेकवेळा काही प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना नवीन बसस्थानक होईपर्यंत सोयीसुविधा द्याव्यात, अशी मागणी केली; परंतु अधिकाऱ्यांनी अजून तरी सुविधा दिल्या नाहीत.
शौचालय आहे; पण पाण्यासह दरवाजेही नाहीत
शहरात नवीन बसस्थानकाचे काम सुरू केले आहे; परंतु गत दोन वर्षांपासून ते रखडले आहे. प्रवाशांसाठी शौचालयाची व्यवस्था केली आहे; परंतु तेथे पाण्याची व्यवस्थाच नाही. लघुशंकागृह पण असून नसल्यात जमा आहे. शौचालयाला दारेही नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या बसस्थानकात चारही बाजूने मोकाट जनावरे, कुत्रे आणि डुकरे आहेत. मोकाट कुत्रे तर शौचालयातही जात आहेत. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रवाशांच्या सोयीकरिता पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
मोकाट कुत्र्यांचा बसस्थानकात वावर
दोन वर्षांपासून नवीन बसस्थानकाचे काम सुरू असल्यामुळे मोकाट कुत्रे व डुकरांना बसस्थानकात येण्यास वाट मोकळी झाली आहे. बस येईपर्यंत चक्क मोकाट कुत्रे बसलेली असतात. गुटख्याच्या पुड्या, पाणी पाऊच व रिकाम्या पाणी बाॅटल बसस्थानकात पाहायला मिळतात.
प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बसस्थानकाचे काम सुरू आहे. काही कारणांमुळे हे काम सध्या बंद आहे. बसस्थानकात धूळ होत असल्यामुळे पाणी टाकण्याची मागणी प्रवाशांनी केली. चिखल होत असल्यामुळे ते शक्य होत नाही. प्रवाशांसाठी सर्वतोपरी सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत.
- संजयकुमार पुंडगे, आगारप्रमुख
बसस्थानकामध्ये कोणतीही सुविधा नाही. शौचालय पडलेले असून दुरुस्त करण्यास महामंडळास वेळ मिळत नाही, असेच दिसते. बसस्थानकात बसण्यासाठी प्रवाशांना जागा नाही. नाइलाजाने मिळेल त्या ठिकाणी प्रवासी बसून बसची वाट पाहतात. महामंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- जनार्दन जाधव, प्रवासी
नवीन बसस्थानकाचे काम सुरू असून तात्पुरते बसस्थानक उभारले आहे; परंतु या ठिकाणी महिला प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही. शौचालय असून नसल्यात जमा आहे. शौचालयात पाणीच नसते. त्यामुळे महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या धुळीत बसावे लागत आहे.
- सविता थोरात, प्रवासी