हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होताना दिसून येत आहे. दोन महिन्यांपासून हिंगोली रेल्वेस्टेशनवरुन तीन एक्सप्रेस सुरु असून त्या रेल्वेचेही आरक्षण करावे लागत आहे.
२३ मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने केंद्राच्या आदेशाप्रमाणे सर्व पॅसेंजर रेल्वे बंद केलेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात मालसेलू, वसमत, धामणी, नांदापूर, बोल्डा, सिरली, चोंडी, मरसूल आदी छोटे रेल्वेस्थानक आहेत. प्रवाशांना बसने प्रवास करणे परवडत नाही. मागील नऊ महिन्यांपासून प्रवाशांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. अशा स्थितीत राज्य शासनाने प्रवाशांच्या सोयीकरकता आणि त्यांच्या खिशाला चाट बसू नये याकरीता एस. टी. भाड्यात कपात करुन प्रवाशांची गैरसोय दूर करायला पाहिजे. एकंदर नऊ महिन्यांपासून प्रवाशांची तारांबळ होत आहे.
गरीब प्रवाशांच्या खिशाला चाट
कोरोना संसर्ग पसरु नये यासाठी रेल्वे विभागाने मार्च महिन्यापासून सर्वच पॅसेंजर रेल्वे बंद केल्या आहेत. एस. टी. महामंडळाचा प्रवास गरिबांना परवडणारा नाही. त्यामुळे दूधवाले, चारा नेणारे, रोजंदारी करणारे मजूर हे हमखास रेल्वेने प्रवास करत होते. परंतु, आज सर्व गरिबांना बस किंवा अवैध वाहतुकीचा सहरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ होत आहे.
तीन एक्सप्रेस सुरू
कोरोना आजार कमी झाला नसला तरी रेल्वे विभागाने तीन एक्सप्रेस हिंगोली स्थानकावरुन सुरु केलेल्या आहेत. यामध्ये अमरावती ते तिरुपती, श्रीगंगानगर ते नांदेड आणि सिकंदराबाद ते जयपूर या एक्प्रेसचा समावेश आहे. पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याचा कोणताही संदेश नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रवासी रेल्वे सुरु करणे आवश्यक
प्रवाशांची होत असलेली तारांबळ आणि होत असलेला खर्च पाहता ते परवडेनासा झाला आहे. हिंगोली येथून दोन रेल्वे सुरु होत्या. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे सुरु होणे आवश्यक आहे.