वसमत तालुक्यातील बोरीपाटीजवळ शुक्रवारी रात्री मंडळ अधिकारी डी. एस. खोकले व तलाठी भुसावले यांनी वाळू घेवून येणारे दोन टिप्पर पकडले होते. यातील एक टिप्पर पकडले तर दुसरे तेव्हाच पसार झाले होते. एक टिप्पर पथकाने दोन तास अडवून ठेवले होते. या टिप्परला वसमतकडे घेवून येत असताना त्यानेही पळ काढला असल्याचे मंडळ अधिकाऱ्यांनी सांगितले. फरार झालेले हे टिप्पर विनाक्रमांकाचे होते. मात्र, ते परळी येथील असल्याची माहिती आहे. तर दुसरे पकडलेले टिप्पर एका सरपंचाचे होते. त्याचा (क्र. एमएच ०४ एफ. यु. ३५४५) आहे. या वाहनांवर काय कारवाई केली, असे विचारले असता हे वाहन पळून गेल्याचे मंडळाधिकाऱ्यांनी सांगितले.
वसमत तालुक्यातील वाळू घाटांवरून रात्रंदिवस उपसा सुरू आहे. हट्टा पोलिसांनी सध्या वाळू वाहनांवर कारवाई करण्याचे बंद केले आहे. महसूल अधिकाऱ्यांना वाळूमाफिया जुमानत नाहीत. अनेक टिप्पर, हायवा थेट नदीघाटांतून वाळू भरून वसमत शहरात येत आहे. तरीही कोणी कारवाई करीत नाही. पकडलेली दोन्ही वाहने पसार झाली आहेत. यामुळे ही वाहने कोणाच्या आदेशावरूनच फरार झाली, अशी उलट चर्चाही होत आहे. यासंदर्भात मंडळाधिकारी खोकले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन्ही टिप्पर पसार झाले असून माझ्याकडे या दोन्ही वाहनांचे फोटो आहेत. या दोन्ही वाहनांवर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.