हिंगोली : सरकारने कितीही खोडा घातला तरी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंच देखील मागे हटणार नाही. सरकार नाना प्रयोग करु पाहत आहे. परंतु मी समाजाला वचन दिले असून, आरक्षण मिळेपर्यंत माझा आंदोलनाचा लढा सुरुच राहणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
१२ मार्च रोजी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे मनोज जरांगे पाटील यांची संवाद सभा झाली. यावेळी परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने कुरुंदा येथे दाखल झाले होते. जरांगे म्हणाले, समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मग मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सरकारने १० टक्के आरक्षण दिले आहे. परंतु ते सरकारचे आरक्षण मला मान्य नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, अशी माझी आधीपासून मागणी आहे. मी यात कोणतीही तडजोड करणार नाही, असे जरांगे यांनी संवाद सभेदरम्यान सांगितले.कुरुंदा येथे आल्यानंतर प्रारंभी जरांगे पाटील यांचा समाजबांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वसमत ते कुरुंदा अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. छत्रपती संभाजीराजे चौकात जरांगे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
स्मशानभूमीतील आंदोलन आठवणीत राहणार...मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कुरुंदावासीयांनी स्मशानभूमीत टेंट टाकून आंदोलन केले. हे आंदोलन माझ्या नेहमीच आठवणीत राहणारे आहे. आपल्या जिवावर राजकारणी मंडळी मोठी झाली आहेत. राजकारणी मंडळींना वेदना कळत नाही तर स्वार्थ तेवढा कळतो. तेव्हा राजकीय नेत्यांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे, असा सल्लाही जरांगे पाटील यांनी दिला.