परतीच्या मान्सूनने हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन खरिपाच्या कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग उडीद यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि इतर मागण्याकरिता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.
हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथसह मतदारसंघातील इतर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने महामार्गवरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. हजारो हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी शेतात घुसून जमिनीचे सुद्धा नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे मदतीची मागणी केली आहे.