लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. यादरम्यान पॅनेल प्रमुख चक्क सरपंच व सदस्यांसाठी बोली बोलून बिनविरोध करण्याच्या कामात गुंतले आहेत. यामध्ये ५ ते १५ लाख रुपयांची बोली बोलली जात आहे. हे लोण जवळपास २५ ग्रामपंचायतींमध्ये पोहोचले आहे. या रकमेतून गाव विकास केला जाणार असल्याचे बाेलले जात आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यामध्ये ७ ते ११ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामुळे गावांतील अनेक पुढाऱ्यांना व राजकारणात नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनुसूचित जाती, जमातींसाठी सरपंच पद आरक्षित असणाऱ्या ग्रामपंचायती वगळल्या तर इतर सर्वच ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. तसेच आर्थिक स्थिती सक्षम असणाऱ्या गाव पुढाऱ्यांना सरपंच पदाचे वेध लागले आहेत. यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यातील २५ ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यामध्ये हिवरखेडा १४ लाख, तुर्कपिंप्री ६.५० लाख, आनखळी ५ लाख, नांदखेड, पेरजाबाद, दूरचुना, असोंदा, निशाना, सोनवाडी, जामगव्हाण या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात जमा आहेत. यासाठी गाव पुढाऱ्यांत ५ ते १५ लाख रुपयांची बोली देऊ केली आहे. यामधून जमा झालेली रक्कम गाव विकासासाठी खर्च केली जाणार आहे.