हिंगोली : आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ३८० गावांत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात येणार असून तब्बल सहा लाख ७२ हजार ३५५ ग्रामस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात वसमत तालुक्यातील अकोली येथून करण्यात आली आहे. ही मोहीम दोन महिने चालणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करणे, जनजागृतीद्वारे या रोगाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येते. यावर्षीही राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनाचे औचित्य साधून ३० जानेवारीपासून अभियान सुरू झाले आहे. कुष्ठरोगाविरुद्धचे अखेरचे युद्ध लढण्यासाठी जिल्ह्यातील ३८० गावांची निवड करण्यात आली आहे. यातील २९ गावे जोखमीची असून वसमत, कळमनुरी, हिंगोली शहरातील ९ वाॅर्डांचा समावेश आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ६ लाख ७२ हजार ३५५ नागरिकांची ६२२ पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने ६२२ आशावर्करची नियुक्ती केली असून ९७ आरोग्यसेवकही असणार आहेत. याशिवाय, २३८ स्वयंसेवक, ४७ आशा गटप्रवर्तक तसेच ११५ समुदाय आरोग्य अधिकारी या मोहिमेत असणार आहेत. नागरिकांच्या अंगावर फिकट लालसर चट्टा, मऊ चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावर गाठी, हातापायामध्ये बधिरता, शारीरिक विकृती अशी लक्षणे आहेत का, याचा शोध या मोहिमेद्वारे घेतला जाणार आहे. अशी लक्षणे आढळलेल्या संशयितांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत.
३ हजार १३२ संशयितांवर उपचार
जिल्ह्यात १९८१-८२ या कालावधीत कुष्ठरोगाचे प्रमाण दर १० हजार ७१.१ होते. ते १९९७-९८ साली हे प्रमाण ६.७ एवढे होते. तर २००५-६ साली याचे प्रमाण ०.३९ झाले. २०१९-२० यावर्षी हे प्रमाण ०.७७ झाले. २०२० अखेर कुष्ठरुग्णांचे प्रमाण ०.५८ एवढे झाले. तसेच २४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत ग्रामीण भागात संपूर्ण लोकसंख्येचे सर्वेक्षण, शहरी भागातील ३० टक्के लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ६ हजार ४१४ संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. १३ ते २८ सप्टेंबर २०१९ या कालावधीत राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत ३ हजार १३२ संशयित रुग्ण आढळून आले होते.
अकोली येथून मोहिमेस सुरुवात
वसमत तालुक्यातील अकोली येथून कुष्ठरोग रुग्ण शोधमोहिमेस सुरुवात झाली. यावेळी ओंकारेश्वर देवस्थानचे अध्यक्ष मधुकर कदम, जिल्हा परिषद सदस्या राजश्री कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, कुष्ठरोग व क्षयरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. राहुल गीते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील देशमुख, डॉ. डिग्रसे, ग्रामसेविका कोमल सूर्यवंशी, सोसायटी चेअरमन प्रल्हाद कदम, एम.जी. पवार, डॉ. गजानन पतंगे, संजय जाधव, माजी सरपंच प्रमोदिनी कदम, एएनएम माने, जाधव, नजिया शेख इस्माईल, सी.एस. पाटील आदींची उपस्थिती होती.
फोटो नं. ८