ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातो छंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:33+5:302021-05-09T04:30:33+5:30

हिंगोली : वर्षाचे १२ महिने पोलीस यंत्रणेवर कुठल्या ना कुठल्या कारणाने ताण असतो. हा ताण कमी करण्यासाठी पोलिसांतर्फे वेगवेगळे ...

Khaki is also a hobby to reduce stress! | ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातो छंद !

ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातो छंद !

googlenewsNext

हिंगोली : वर्षाचे १२ महिने पोलीस यंत्रणेवर कुठल्या ना कुठल्या कारणाने ताण असतो. हा ताण कमी करण्यासाठी पोलिसांतर्फे वेगवेगळे छंद जोपासले जात आहेत. हिंगोली पोलीस दलातही विविध छंद जोपासणारे कर्मचारी कार्यरत आहेत. कुणी गायन, वादन, कीर्तनाचा, तर कुणी कविता, साहित्य लेखनाचा छंद जोपासला आहे. त्यामुळे मन प्रसन्न होऊन ताण कमी होण्यास मदत मिळत असल्याचे ते सांगतात.

मागील वर्षभरापासून कोरोनाने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. कोरोनाला हरविण्यासाठी पोलीस यंत्रणेची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यात विविध गुन्ह्यांचा तपास करणे, रात्रीची गस्त घालणे, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणे यासह सण, उत्सवानिमित्त कर्तव्य पार पाडावे लागत आहे. त्यामुळे वर्षभर कामाचा व्याप असतो. १२ महिने असलेला कामाचा व्याप पाहता यातून मानसिक ताण-तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मन प्रसन्न राहावे, कामाचा उत्साह कायम रहावा, यासाठी अनेक पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी विविध छंद जोपासण्यावर भर दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातही काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाचन करणे, व्यायाम करणे, प्राणायाम करणे, गायन करणे, कीर्तन करणे, बासरी वादन करणे, चित्रपटातील गाणे गुणगुणने, आदी छंद जोपासले आहेत. कर्तव्य बजावून मिळालेल्या वेळेत हा छंद जोपासला जातो. यातून दिवसभरातील थकवा कमी होऊन कामाचा नवा उत्साह संचारत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

गायनाने मन प्रसन्न राहते

हिंगाेली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके यांना वाचन, चित्रपटातील गाणे गुणगुणण्याची आवड आहे. कामाच्या व्यापातून वेळ मिळाल्यानंतर ते विविध चित्रपटातील गाणे गुणगुणतात. यातून दिवसभरातील ताण-तणाव कमी होऊन मन प्रसन्न राहते. तसेच कामाचा उत्साह कायम राहण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले.

बासरी वादनातून मनाची एकाग्रता वाढते

सेनगाव पोलीस ठाण्यातील जमादार सुरेश कमलाकर पाईकराव यांना लहानपणापासून बासरी वादनाची आवड आहे. त्यांनी अनेक भीम गीते तयार केली असून, नाटक, साहित्य क्षेत्रातही लेखनाची आवड आहे. १९९६ मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बासरी वादनासाठी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून (एनसीसी) त्यांची निवड झाली होती. बासरी वादनाने दिवसभरातील ताण तणाव कमी होण्यास मदत होते, असे ते म्हणाले.

कीर्तनातून समाजप्रबोधनाचे काम

हिंगोली येथील श्वान पथकातील पोना गणपत मस्के यांना २०१८ पासून कीर्तनाची आवड निर्माण झाली. त्यांच्या पत्नी, दोन मुलींनाही कीर्तनाची आवड आहे. कामाच्या व्यापातून वेळ मिळाल्यानंतर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे ते कार्य करतात. गायन, कीर्तनामुळे मन एकाग्र राहण्यास मदत होते. कर्तव्य बजावताना कामाचा उत्साह कायम राहतो, असे ते म्हणाले.

कविता करण्याच्या छंदातून ताण कमी होतो

हट्टा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक माणिक दत्तात्रय डुकरे यांना कविता करण्याचा छंद आहे. कर्तव्य बजावताना सभोवताली दिसणारे प्रश्न, आलेले अनुभव कवितेच्या माध्यमातून रचनाबद्द करण्यावर त्यांचा भर असतो. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीलाही कविता करण्याचा छंद आहे. कविता करण्याच्या छंदामुळे कामाचा ताण अजिबात जाणवत नसल्याचे ते म्हणाले.

Web Title: Khaki is also a hobby to reduce stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.