हिंगोली : सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरु असून साथीच्या विविध आजारांनी डोके वर काढले आहे. पण शासकीय सुटी आली की, अपघात विभाग वगळला तर सर्व ओपीडींना सुटी राहते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची तसेच नातेवाईकांची तारांबळ उडते. सुटीच्या दिवशी एखादी तरी ओपीडी उघडी ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.
गत पंधरा दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, हिवताप, जुलाब आदी आजारांचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. दोन दिवसांपूर्वी तर ४९ साथीच्या आजारांचे रुग्ण दाखल झाले होते.
दुसरीकडे दर मंगळवारी व शुक्रवारी वयाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी शहर तसेच परिसरातील अनेक वयोवृद्ध, निराधार हे येत असतात. सुटीची माहिती नसल्याने त्यांनी जिल्हा रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर ठाण मांडले होते. बाहेर गावांहून आलेल्या निराधारांना परत कसे पाठवावे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यवंशी यांनी डॉ. पाटील यांना सूचना करत वयाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
सुटीच्या संदर्भात फलक लावला जाईल...
सुटीच्या दिवशी अपघात विभाग तेवढा सुरु असतो. इतर ओपीडी मात्र बंद असतात. दुसरीकडे जर अतिगंभीर रुग्ण असेल तर लगेच डॉक्टरांची व्यवस्था केली जाते. बहुतांश लोकांना सुटीच्या कल्पना नसते. यापुढे ज्या दिवशी सुटी राहील त्या दिवशी रुग्णालयाबाहेर सुटीच्या संदर्भात फलक लावला जाईल.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक
फोटो
मंगळवार वयाचे प्रमाणपत्र काढण्यासाठीचा असल्याने हिंगोली जिल्हा रुग्णालयात निराधार, ज्येष्ठांनी ठाण मांडले होते.