हिंगोली : जिल्ह्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे पाच रुपयांनी भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे बाजारात पहायला मिळाले.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भाजीपाल्यांची आवक जास्त झाल्यामुळे भाजीपाला स्वस्त झाला होता. परंतु, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाली. त्यामुळे पाच रुपयांनी भाजीपाला महागला आहे. परिणामी ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे.
शहरातील मंडईमध्ये रविवारी टोमॅटो २५ रुपये किलो, फूलकोबी २० रुपये, पानकोबी २५ रुपये, ढोबळ मिरची ३० रुपये, अद्रक ५० रुपये, कोथिंबीर ३०, कडीपत्ता ८० रुपये, मिरची ६० रुपये, गाजर ४०, लिंबू २५ रुपये, काकडी २५ रुपये, चवळी ४० रुपये, भेंडी ४० रुपये, मुळा २५ रुपये किलोदराने विकला गेला.
मागच्या आठवड्यात मंडईमध्ये ढोबळ मिरची ३५ रुपये किलो, अद्रक ४५ रुपये, कडीपत्ता ७५ रुपये किलो दराने विकला गेला होता. डिग्रस, औंढा नागनाथ, कळमनुरी व जवळपासच्या खेड्यांतून येणाऱ्या भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाला महाग झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
वर्षाच्या शेवटी शेंगदाणा, सूर्यफूल आदी तेलात १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. तूरडाळ, मसूरडाळ, हरभराडाळ, मूगडाळीचे भाव स्थिर असले तर तांदूळ मात्र ३ रुपयांनी महागला आहे. मागच्या आठवड्यात तेलाचे भाव १०० रुपये होते, आता तेलाचे भाव ११० ते ११५ झाले आहेत.
शहरातील मंडईमध्ये सफचंदाची आवक कमी झाली आहे. सफरचंद १०० रुपये किलोने विकले गेले. डाळिंब १०० रुपये किलो, चिकू ६० रुपये, पेरू ३० रुपये, संत्रा ४० रुपये, पपई ३० रुपये, टरबूज २० रुपये, खरबूज २० रुपये, स्ट्रॉबेरी १०० रुपये दराने विकली गेली.
डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तांदळाचे भाव ५५ रुपये एवढे होते. वर्षाच्या सरतेशेवटी म्हणजे, शेवटच्या आठवड्यात तांदळाचे भाव ६० रुपये किलो झाले आहेत, असे व्यापारी विजय गुंडेवार यांनी सांगितले.