जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील सदाशिव नगरात २२ डिसेंबर राेजी घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सोन्या - चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. २६ डिसेंबर राेजी या घटनेची पाेलिसांत नाेंद करण्यात आली आहे.
जवळा बाजार येथील सदाशिव नगरातील रमाकांत मुंजाजी झाटे यांच्या घरी २२ डिसेंबरच्या मध्यरात्रीला घरातील किचन रूममध्ये प्रवेश करून कपाटातील २० हजारांचे सोने व नगदी ५ हजार असा एकूण २५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यामुळे याप्रकरणी झाटे यांनी हट्टा पोलिसांत फिर्याद दिली. यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध २६ डिसेंबर राेजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार बी. जी. राठोड याबाबत तपास करीत आहेत. जवळा बाजार परिसरात अनेक चोरटे सक्रीय झाल्याने पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बाेलले जात आहे.