देशपातळीवर १ ते ३० सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय पोषण महाअभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभियानातून कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी तसेच किशोरवयीन मुली, गरोदर महिला आणि शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्याची ही काळजी घेण्यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे.
हिंगोली शहरातही एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे व जिल्हा शल्य चिकित्सक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविले जात आहे. मस्तान शाहानगरातील अंगणवाडी क्रमांक ४ येथे या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य सेविका टी. के. घुगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदुमती पेरके, डाॅ. मधुकर भोसले, आरोग्यसेविका पुण्यरथा कांबळे, राहुल घुगे यांची उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर परिसरातील बालकांची आरोग्य तपासणी करून उंची व वजन घेण्यात आले. त्यानुसार सॅम व मॅम बालकांची ओळख करण्यात आली. पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका उषा वाठोरे, शशिकला खडसे, मीना मस्के, नंदा दिपके, संघमित्रा भालेराव आदींनी पुढाकार घेतला.
फोटो : ०२