- दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली) : घरकुल योजनेमध्ये नवीन नावे समाविष्ट करावी, रखडलेल्या घरकुलांची बिले तत्काळ देण्यात यावी आदी मागण्यांसाठी गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी सेनगाव येथे असलेल्या महावितरणच्या मोठ्या लाईनवर असलेल्या टॉवरवर चढून आंदोलन केले.
मागच्या काही महिन्यांपासून घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट झाली नाहीत. तसेच अनेक लाभार्थ्यांचे रखडलेले बिले अजूनही ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बरेच लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित असून त्यांचा योजनेमध्ये समावेश करण्यात यावा याबाबत अनेकवेळा सेनगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. परंतु अद्यापही कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. दिवसेंदिवस लाभार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन लक्ष देत नाही हे पाहून २५ फेब्रुवारी रोजी विद्युत टॉवरवर चढून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पंचायत समिती सेनगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या सदर निवेदनावर नामदेव पतंगे, प्रवीण मते, संदीप मानमोठे, शामकुमार मते, राजेश मते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.