हिंगोली: ख्रिसमस नाताळ व नवीन वर्षाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत सोन्याला ५१ हजार ५०० रुपये तोळा तर चांदीला ६८ हजार रुपये किलो असा भाव राहिला. त्याचबरोबर सलग तीन दिवस सुट्या आल्याने सोने-चांदीच्या दुकानांत गर्दी पहायला मिळाली. सोन्यामध्ये एक हजार तर चांदीमध्ये चार हजारांनी वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सोन्याचा भाव ५० हजार ५०० रुपये तोळा तर चांदीचा भाव ६४ हजार रुपये किलो असा होता. हिंगोली शहरातील बाजारपेठ ही अत्यंत महत्त्वाची असून मुंबई, हैदराबाद, इंदोर या मोठ्या शहरांतून सोने-चांदी आयात केली जाते. इंग्लंडमधील नवीन विषाणूचा पुन्हा बाजारपेठेवर परिणाम होणार अशा शक्यतेने आंतरराष्ट्रीय घडामोडीवर अवलंबून असलेल्या सोने-चांदीच्या दरावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे.
हिंगोली शहरात सराफांची दुकाने ५० असून जिल्ह्यात ६५ दुकाने आहेत. मार्च महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सराफा दुकाने ६५ दिवस पूर्णपणे बंद होती. नंतर मात्र जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे दुकाने सुरू करण्यात आली. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे.
कारागिरांना आले चांगले दिवस
२३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र सुरू झाला. त्यामुळे सराफा दुकाने त्यादरम्यान बंद होती. त्यामुळे सराफा दुकानांतील कारागिरांवर उपासमारीची वेळ आली होती. सद्य:स्थितीत हिंगोलीतील बाजारपेठ सुरळीत सुरू झाली असून कारागिरांनाही चांगले दिवस आले आहेत. ख्रिसमस व सलग येणाऱ्या सुट्यांमुळे कारागिरांना जेवण करायलाही वेळ मिळत नाही. ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे कारागीर वस्तू तयार करून देत आहेत. सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीत हिंगोलीची बाजारपेठ चांगली असल्याचे सराफा व्यापारी नगेशअप्पा सराफ यांनी सांगितले.