सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये ७९९ ग्रा. पं. सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. सरपंचपदाचे आरक्षण अनिश्चित असल्याने केवळ अंदाज बांधत सरपंचपदाचे उमेदवार कामाला लागले आहेत. गावपातळीवरील राजकारण दिवसेंदिवस चांगलेच तापत आहे. ऐन कडाक्याचा थंडीमध्ये गाव पातळीवरील राजकीय आखाडा चांगलाच रंगात आला आहे. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोरेगावात पारंपरिक विरोधक व प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात पॅनल उभे करून चुरशीची लढत देत. मात्र, आता माजी आ. साहेबराव पाटील व माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी एकत्र येऊन संयुक्तिक पॅनल उभे करण्याची तयारी चालविली आहे. पारंपरिक विरोधक एकत्र आल्याने याठिकाणी जिल्हा परिषद सदस्य संजय नामदेवराव कावरखे, भाजपचे डॉ. रवींद्र पाटील व माजी सभापती नथ्थुजी कावरखे यांनी या मातब्बरांच्या पॅनलला शह देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे गोरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विशेषत: दोन्ही माजी आमदारांच्या पॅनल विरुद्ध विरोधकांचे संयुक्तिक पॅनल कितपत आव्हान देणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे, तसेच अनेक नवयुवकांकडे विरोधकांचे संयुक्तिक पॅनलला ‘पर्यायी’ म्हणून पाहिले जात असल्याने त्यांचा काैल महत्त्वाचा ठरणार आहे.
सेनगाव तालुक्यातील सर्वांत छोट्या असलेल्या सात सदस्यीय व लोकसंख्या सर्वांत कमी असलेल्या सोनसावंगी ग्रामपंचायतमध्येही दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.
सर्वांत मोठी ग्रामपंचायत
गोरेगाव
सर्वांत लहान ग्रामपंचायत सोनसावंगी आहे. तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या ९७, तालुक्यातील एकूण सदस्य संख्या ७९९, तालुक्यातील एकूण मतदार १३६६९५ आहेत. यामध्ये पुरुष मतदार
७१८०२, तर स्त्री मतदार ६४८९३ आहेत.