हिंगोली : जिल्ह्यातील जवळपास ४९५ ग्रामपंचायतीसाठी नुकतीच निवडणूक झाली. ही निवडणूक ग्रामपंचायतीच्या कर वसुलीसाठी वरदान ठरली असून घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून ५ कोटी २३ लाख ३३ हजार रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांचाही समावेश आहे.
ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांना विविध सुविधा पुरविल्या जातात. त्यापोटी ग्रामस्थांना कर आकारला जातो. यात पाणीपट्टी व घरपट्टीचा समावेश आहे. यातूनच ग्रामपंचायतींना कर मिळतो. परंतु, ग्रामपंचायतीचा कर वसूल करणे म्हणजे मोठे जिकरीचे काम आहे. अनेकजण वर्षानुवर्ष घरपट्टी व नळपट्टीचा भरणा करीत नाहीत. प्रशासनाकडूनही फारसा प्रयत्न होताना दिसून येत नाही. राजकीय पुढारीही याकडे कानाडोळा करतात. यातून दरवर्षी लाखो रुपयांचा कर थकीत राहतो. ३१ मार्च २०२० अखेर पाचही तालुक्यांतील घरपट्टीची थकबाकी ६६ लाख २ हजार रुपये होती. तर २०२०-२१ वर्षासाठी ५ कोटी ९४ लाख ८४ हजार रुपयांचे उदिष्ट होते. जवळपास ६ कोटी ६० लाख ८६ हजार रुपयांच्या घरपट्टी वसुलीचे आव्हान ग्रामपंचपायतीसमोर होते. घरपट्टीच्या थकीत आकड्याने प्रशासनही हतबल झाले होते. मात्र घरपट्टी वसुलीची आयतीच संधी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून चालून आली.
जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींच्या ४ हजार ३५ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीला तब्बल ९ हजार ९६७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणुकीसाठी घरपट्टी भरणे बंधनकारक असते. त्याशिवाय उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे तब्बल ९ हजार ९६७ जणांकडून आयतीच घरपट्टी वसूल झाली. घरपट्टी वसुलीमध्ये हिंगोली तालुक्यात ३१ मार्च २०२० अखेर व २०२०-२१ या चालू वर्षातील एकूण १ कोटी ५१ लाख ५६ हजारांपैकी डिसेंबर २०२० अखेर ८६ लाख ७२ हजार रुपयांची वसुली झाली आहे. वसमत १ कोटी ५ लाख ७७ हजारांपैकी ६४ लाख ७० हजार, औंढा नागनाथ १ कोटी ९ लाख २१ हजारांपैकी ६४ लाख ६ हजार, कळमनुरी १ कोटी ४८ लाख ८७ हजारांपैकी ८२ लाख २ हजार, सेनगाव १ कोटी ४५ लाख ४५ हजारांच्या रकमेपैकी डिसेंबर २०२० अखेर ५७ लाख ३५ हजार रुपयांच्या घरपट्टीची वसुली झाली आहे. पाचही तालुक्यांतून ६ कोटी ६० लाख ८६ हजारांच्या घरपट्टी रकमेपैकी ३ कोटी ५४ लाख ८५ हजार रुपयांच्या घरपट्टीची वसुली झाली आहे. याची एकूण टक्केवारी ५३.७० आहे.
१ कोटी ६८ लाखांची पाणीपट्टी वसूल
जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, औंढा ना., कळमनुरी, सेनगाव अशा पाच तालुक्यातील ३१ मार्च २०२० अखेर ३६ लाख १४ हजारांची पाणीपट्टी थकीत होती. तर २०२०-२१ या चालू वर्षातील २ कोटी ५५ लाख ९१ हजारांची चालू थकबाकी आहे. यापैकी डिसेंबर २०२० अखेर हिंगोली तालुक्यात २६ लाख ५५ हजारांची पाणीपट्टी वसूल झाली. वसमत २४ लाख ९५ हजार, औंढा ना. २५ लाख ६२ हजार, कळमनुरी ५४ लाख ८१ हजार, सेनगाव ३६ लाख ५५ हजारांची थकीत पाणीपट्टी वसूल झाली आहे. याची टक्केवारी ५७.६९ आहे. पाणीपट्टी वसुलीमध्ये वसमत तालुक्याने ६७.७३ टक्के वसुली करत आघाडी मिळविली आहे. त्यानंतर हिंगोली ६४.९५, कळमनुरी ६०.१४, औंढा ना. ५९.६८, सेनगाव ४५.५३ टक्के वसुली केली आहे.