हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून शिकवलेला अभ्यास विद्यार्थ्यांना कितपत समजला, यासाठी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ४६ टक्के विद्यार्थी स्वाध्यायावर अभ्यास करीत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. त्यामुळे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासात मग्न राहत आहेत. ऑनलाइन शिकविलेला अभ्यास कितपत विद्यार्थ्यांना समजला हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने स्वाध्याय उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये पाहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत त्यांना स्वाध्याय दिले जात आहेत. घरी बसून हे स्वाध्याय सोडवून घेतले जात आहेत. याचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होत आहे. जिल्ह्यातही या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून १ लाख ५८ हजार ६९५ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यातील ९६ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रम सोडविण्यास सुरवात केली आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमातील विद्यार्थीही सहभागी झाले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थी घरी बसून अभ्यास करताना दिसून येत आहेत.
विद्यार्थी म्हणतात...
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्याद्वारे सरावासाठी स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. मात्र, अभ्यास करताना अनेक वेळा नेटवर्कचा प्रश्न निर्माण होत आहे. एकच मोबाइल असल्याने ऑनलाइन अभ्यास करताना अडथळा निर्माण होत आहे. स्वाध्याय उपक्रमाचा फायदा होत आहे.
- नंदिनी इंगोले, इयत्ता सहावी
कोरोनामुळे शिक्षणात खंड पडत होता. त्यामुळे शाळेने विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करून ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. स्वाध्यायामुळे ऑनलाइन शिकविलेला पाठ किती समजला हे समजत आहे. यामुळे अभ्यास होत आहे.
-महेश शिवाजी भांडे, शिरड शहापूर
मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमाचा सहभाग
या उपक्रमात मराठी, उर्दूसह इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला आहे. मराठी माध्यमाची ७८ हजार ७६ विद्यार्थी असून, इंग्रजी माध्यमाचे २५ हजार ४८२ तर उर्दू माध्यमातील ९ हजार २७९ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
शिक्षणाधिकाऱ्याचा कोट
स्वाध्याय उपक्रमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने, शाळेने या उपक्रमात सहभागी व्हावे. जिल्ह्याची चांगली कामगिरी असून, राज्यात हिंगोली जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. विद्यार्थ्यांना स्वाध्यायाचा निश्चितच फायदा होणार आहे.
- संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी
स्वाध्याय उपक्रमात जिल्हा तिसऱ्या स्थानी
स्वाध्याय उपक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होत असून, जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. बुलडाणा, वाशीम नंतर हिंगोली तिसऱ्या स्थानी आला आहे. जिल्ह्यातील ४५.९४ टक्के विद्यार्थी स्वाध्याय सोडवित आहेत.