हिंगोली : मागील काही महिन्यांपासून बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळेना झाले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता एस. टी. महामंडळाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
कळमनुरी: तालुक्यातील ग्रामीण भागात विहिरींना सद्य:स्थितीत तरी पाणी मुबलक प्रमाणात आहे. परंतु, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणी पिकांना देता येत नाही. परिणामी रबी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त
कळमनुरी: तालुक्यातील आखाडा बाळापूर, कांडली, डोंगरकडा, वारंगा आदी भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले. परंतु, अजून तरी कोणीही लक्ष दिलेले नाही. रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.