लॉकडाऊन संपला तरीही मुलांना घराबाहेर सोडू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:57+5:302021-05-16T04:28:57+5:30
हिंगोली : जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा कहर सुरू आहे. दुसऱ्या लाटेत बऱ्यापैकी लहान मुलांमध्ये कोरोनाने पाय पसरले आहेत. तिसऱ्या लाटेत ...
हिंगोली : जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा कहर सुरू आहे. दुसऱ्या लाटेत बऱ्यापैकी लहान मुलांमध्ये कोरोनाने पाय पसरले आहेत. तिसऱ्या लाटेत तर लसीकरण नसल्याने मुलांनाच जास्त धोका सांगितला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात ५० बेडचा स्वतंत्र बाल कोविड वाॅर्ड तयार केला आहे.
हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत मुलांमध्ये कोरोनाचा तेवढा शिरकाव नव्हता. साडेतीन हजार रुग्णांमध्ये ३४१ जण १८ वर्षांच्या आतील होते. दुसऱ्या लाटेनंतर आता रुग्णसंख्या १४ हजार ६९० वर पोहोचली आहे, तर १८ वर्षांच्या आतील बाधितांचा आकडा २३८५ च्या पुढे सरकला आहे. त्यामुळे जवळपास दीडपट रुग्ण वाढले आहेत. त्यातच जसजशा लाटावर लाटा आदळत आहेत, तसा कोरोनाचा स्ट्रेन घातक होत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपला तरीही मुलांना घराबाहेर पडू न देणेच फायद्याचे ठरणार आहे. घरगुती कार्यक्रमाच्या नावाखाली शेजारीपाजारी अथवा रस्त्यावर फिरणाऱ्या, खेळणाऱ्या मुलांनाही कोरोना होत आहे. घरात कुणीच बाधित नसताना लहान मुले बाधित येण्याचे प्रमाणही यातून वाढत आहे. शिवाय काही मुलांना आधी कुटुंबातील सदस्य बाधित आढळला तरीही कोरोना झाला नव्हता. अशांपैकी काहींना आता एमआयएस नावाचा आजार आढळत आहे. तो जास्त धोकादायक व उपचार खर्चिक आहेत. त्यामुळे खबरदारी हाच उपाय समजून मुलांची काळजी घ्यावी लागणार आहे.
५० खाटांचे पीआयसीयू सज्ज
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे कोविड सेंटर सज्ज केले. यात ५० बेड ऑक्सिजनचे असतील. २५ व्हेंटिलेटर आहेत. शिवाय ५० खाटांचे पोस्ट कोविड सेंटरही लहान मुलांसाठी सुरू करण्यात येणार आहे. एमआयएससारख्या आजाराचा धोका लक्षात घेता ही काळजी घेतली जात आहे. मात्र, लहान मुले कोरोनाच्या कचाट्यात जाऊ नयेत यासाठी पालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे काय?
लहान मुलांनाही ताप, सर्दी, खोकला, घशात व नाकात खवखव, जुलाबाचा त्रास, पोट दुखणे अशी लक्षणे आढळून येत आहेत. काही मुलांना अंगावर पुरळ येणे, ताप वाढणे अशीही लक्षणे आढळत असून ती कोरोना अथवा पोस्ट कोरोनाची असू शकतात.
याशिवाय वास न येणे, थकवा व जेवण न जाणे ही सर्वांत आढळणारी लक्षणेही लहान मुलांमध्ये कोरोनात आढळून येत आहेत.
लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी
कोरोनाचा आजार लहान मुलांमध्ये पहायला मिळत आहे. अनेक मुलांमध्ये सौम्य लक्षणे आढळत आहेत. मात्र, काहींना यातही त्रास होत आहे. त्यातच लसीकरण नसल्याने लहान मुलांना पालकांनी जास्त जपणे गरजेचे आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांनी मुलांपासून दूर राहिले पाहिजे.
-गोपाल कदम, बालरोगतज्ज्ञ.
लस नसल्याने असुरक्षित वर्ग म्हणून १८ वर्षांआतील मुलांचा उल्लेख करता येईल. त्यांना सार्वजनिक ठिकाणी, खेळण्यासाठी, अंगत-पंगतीस किंवा कोणत्याही घरगुती कार्यक्रमास बाहेर जाऊ देऊ नये, तर बाहेरच्यांनाही बोलावू नये. मुलांमध्ये कोरोनाची कधी कधी गंभीर लक्षणे दिसत आहेत.
-डॉ. दीपक मोरे, बालरोगतज्ज्ञ.
लहान मुलांसाठी लस नाही. त्यामुळे धोका वाढू शकतो. त्यामुळे त्यांना बाहेर पडू देऊ नये. घरातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांनी लस घ्यावी. जर घेतली नसेल तर या मुलांपासून सामाजिक अंतराने वागले पाहिजे.
डॉ. स्वप्निल गिरी, बालरोगतज्ज्ञ.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित
१४६९०
एकूण बरे झालेले रुग्ण
१३६९०
कोरोनाचे १८ वर्षांखालील रुग्ण २३८५
दुसऱ्या लाटेतील रुग्ण २०५०
१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण ६७०