कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आखाडा बाळापूर असून, सर्वात लहान ग्रामपंचायत डिग्गी आहे. यामध्ये दुरंगी लढत हाेणार आहे. डिग्गी येथे ७ सदस्य संख्या आहे. २७५ मतदार असून, ३ वार्ड आहेत. यामध्ये पुरुष मतदार १५१, तर महिला मतदार १२४ आहेत. या गावात रवी कांबळे व भाऊराव राऊत यांचे पॅनेल ग्रामपंचायत निवडणुकीत उभे आहे. मागच्या वेळेला कांबळे यांच्या पॅनेलचा सरपंच होता.
डिग्गी हे धरणग्रस्त गाव आहे. येथे आजही पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ही समस्या अजूनही सुटलेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गाव पुनर्वसनामुळे या गावात अनेक समस्या आजही कायम आहेत. तसेच येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काट्याची टक्कर होणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वांना सरपंच पदाचे डोहाळे लागलेले आहेत. या गावात राजकारण वातावरण तापले असून, गल्लीबोळात निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत.