फळगाड्यामुळे वाहतुकीस अडथळा
हिंगोली : शहरातील बसस्थानक ते गांधी चौक दरम्यान काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध फळगाडे लावून फळांची विक्री केली जात आहे. या फळगाड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. इतर वाहनांना रस्ता काढताना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने दखल घेऊन फळगाडीचालकांना इतरत्र जागा द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतातूर
कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. मागील आठ दिवसांपासून थंडी तसेच ढगाळ वातावरण पडत असल्यामुळे तूर पीक धोक्यात आले आहे. कृषी विभागाने तूर उत्पादक शेतकऱ्यांना पिकावर पडत असलेल्या रोगाबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे
हिंगोली : शहरातील तोफखाना, शास्त्रीनगर, इंदिरानगर आदी भागामध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळत आहेत. साचलेला कचरा घंटागाडी घेऊन जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन घंटागाडी या भागामध्ये पाठवावी व कचरा उचलून न्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डिग्रस फाटा येथे गतिरोधक बसविण्याची मागणी
डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहने वेगाने चालविली जात आहेत. गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित विभागाने वाहनांची संख्या लक्षात घेऊन डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
विजेच्या लपंडावाला शेतकरी वैतागले
कळमनुरी: मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने विहीर व तलावांना पाणी भरपूर प्रमाणात आहे. परंतु, वीज खंडित होत असल्यामुळे पाणी पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बंदी असतानाही जड वाहने शहरात
हिंगोली : जड वाहनांना शहरात बंदी असतानाही काही वाहनचालक नियमांचा भंग करीत जड वाहने शहरात घेऊन येत आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना शहरात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त
कळमनुरी : कळमनुरी ते आखाडा बाळापूर मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांचे अतोनात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगूनही अद्याप कोणीही लक्ष दिले नाही. वेळीच लक्ष देऊन वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.