तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल
हिंगोली : जिल्हाभरात खरीप हंगामात पुरेशा प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश जलसाठे भरले होते. आता पाणीसाठा कमी झाला असला तरी यात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. तसेच अनेकांच्या बोअर, विहिरींना पाणी आहे. आता कापूस वेचणी संपल्याने शेतकरी आता तीळ पीक घेत असल्याचे चित्र आहे. अनेकांनी तिळाचा पेरा केला असून पाणी देणे सुरू आहे.
ढगाळ वातावरणाचा आंबा पिकास फटका
हिंगोली : जिल्हाभरात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. १८ व १९ फेब्रुवारी रोजी अनेक ठिकाणी पाऊसही झाला आहे. यामुळे हरभरा, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी ढगाळ वातावरणाचा फटका आंबा या फळ पिकासही बसला आहे. यामुळे फूल मोहर गळत असून उत्पादनात घट होण्याची भीती आंबा उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.
माळरानावर बहरली रोपटे
हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील जरोडा, येलकी परिसरात उभारण्यात आलेल्या सशस्त्र सीमा बल परीसरातील माळरानावर वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले होते. आता ही रोपटे चांगल्या स्थितीत आहेत. वन विभागाच्या वतीने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले असून रोपट्यांची देखभाल केली जात आहे.
गतिरोधक बनले धोकादायक
हिंगोली: शहरातील अकोला बायपासजवळ गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र गतिरोधकांची उंची मोठी असल्याने अनेक दुचाकी वाहनचालक गतिरोधकाला वळण घालून वाहने नेत आहेत. गतिरोधकाला कट मारण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता बळावत आहे. अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले उंची जास्त असल्याने ही गतिरोधक गैरसोयीचे ठरत आहे.
खिळखिळ्या वाहनांतून गौण खनिजाची वाहतूक
हिंगोली: जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध गौण खनिजाची वाहतूक हेात आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यात गौण खनिजाची खिळखिळ्या वाहनातून वाहतूक होत असल्याने इतर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. कधी अपघात होईल, याचा नेम नसल्याने अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बस सुरू करण्याची मागणी
कळमनुरी: कळमनुरी तालुक्याचा विस्तार मोठा आहे. ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामस्थ कळमनुरी येथे विविध कार्यालयात येतात. कळमनुरी येथे येण्यासाठी प्रवासी वाहने असली तरी जाताना सायंकाळी परत जाताना प्रवासी वाहने मोजकीच आहेत. रात्री उशिर झाल्यास एकही प्रवासी वाहन नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.