कळमनुरी : कोरोना महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे केवळ शहरी भागासाठीच बसेस सोडण्यात येत आहेत. परिणामी प्रवासी संख्येत घट झाल्याचे पहावयास मिळत आहे.
गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरी भागासाठी ९८ बसफेऱ्या होत आहेत.
सदरील बसफेऱ्यांतून दररोज सव्वादोन लाखांच्या जवळपास उत्पन्न होत आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना पूर्णत: कमी झाल्यास ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू होतील, असे आगारप्रमुखांनी सांगितले.
परराज्यांतून किंवा परजिल्ह्यांतून बसेस आल्या तर प्रत्येक प्रवाशांची अँटिजेन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी बसस्थानकात आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, पथक प्रवाशांची तपासणी करून घेत आहे. प्रवासी मिळत नसल्यामुळे बसेस रिकाम्या धावत आहेत. परिणामी उत्पन्नावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे.
प्रवासी मिळाल्यास बसेस सुरू करू
सद्य:स्थितीत शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थीही घरीच आहेत. पूर्वीसारखी प्रवाशांची संख्या दिसत नाही. काही लोक खासगी वाहनांचा उपयोग करून प्रवास करत आहेत. प्रवासी संख्या वाढली तर ग्रामीण व इतर भागातील एसटी बसेस सुरू करण्यात येतील.
- शेख फेरोज, स्थानकप्रमुख, कळमनुरी