हिंगोली : ऑल इंडिया कौन्सिल फाॅर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र व गणित हे विषय वगळले आहेत. मात्र अभियांत्रिकीचा पायाच असणारे विषय वगळले तर अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे कसे? असा सवाल जाणकार व्यक्त करीत आहेत. तर विद्यार्थ्यांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र (पीसीएम) विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकत होता. आता अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय एआयसीटीईने वगळले आहेत. गणित हा विषय अभियांत्रिकीचा पाया आहे. अभियांत्रिकीच्या जागा भरावयाच्या म्हणून घेतलेला हा निर्णय धोकादायक असून एक ते दोन बॅचेस पूर्ण झाल्यानंतर हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे की नाही हे समजेल, असे जाणकार मत व्यक्त करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील जाणकार नाराजी व्यक्त करीत असले तरी विद्यार्थ्यांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा निर्णय चुकीचा असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर मेडिकल प्रवेशाची संधी हुकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय योग्यच असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेत. गणित विषयाशिवाय अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे अभियांत्रिकीला प्रवेश मिळाल्यानंतर गणित विषयाचे जादा वर्ग घेणार आहेत का? बारावी बोर्डाकडूनही तशी तयारी केली जाणार आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. गणित हा विषय वगळण्याचा निर्णय सध्या तरी चुकीचा वाटतोय.
-प्रा. एस.आर. उपरे,
अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेत. एआयसीटीई ने घेतलेला निर्णय चुकीचा असून भविष्यात गणित विषयालाही फटका बसू शकतो. अशा निर्णयामुळे दहावीचे विद्यार्थीही गणित विषयच नको, अशी मागणी करतील. त्यामुळे अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय कायम ठेवावेत.
-प्रा. आर. ए. गायकवाड
गणित व भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे हा निर्णय बदलून अभियांत्रिकीसाठी हे विषय कायम ठेवावेत. ज्या विद्यार्थ्यांना गणित व भौतिकशास्त्र हे विषय अवघड वाटतात त्यांना इतरही शाखेत प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करता येऊ शकते.
-तेजस्वीनी सितापराव, विद्यार्थीनी
मेडिकलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मेडिकलची संधी हुकली तर अशा विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे असतो. पूर्वी मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची संधी मिळत नव्हती. आता या निर्णयामुळे मेडिकलची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.
-शुभम सावके, अभियांत्रिकी विद्यार्थी
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीला पसंती
जिल्ह्यात एकमेव अभियांत्रिकी कॉलेज होते. मात्र यामध्ये आता प्रवेश दिले जात नसल्याचे माहिती विद्यार्थ्यांमधून मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत. जिल्ह्यातही अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.