जिल्हा रुग्णालयात शहर व ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना बाहेर जाऊन सिटी स्कॅन करण्याची वेळ येऊ नये म्हणून रुग्णांच्या सोयीसाठी दोन सिटी स्कॅन मशीनची व्यवस्था केली. परंतु, गत दीड वर्षांपासून रुग्णालयाच्या आत असलेले सिटी स्कॅन मशीन तांत्रिक बाबीमुळे बंद आहे. दोन महिन्यांपूर्वी तर बाहेरील भागात असलेले सिटी स्कॅन मशीनही बंद पडले होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ‘सिटी स्कॅन मशीन बंद आहे’ अशी सूचना लावली होती. परंतु, ही सूचना सिटी स्कॅन मशीन सुरू होऊनही बरेच दिवस तशीच ठेवली होती. त्यामुळे अनेक रुग्ण सूचना वाचून परत जात होते. सद्य:स्थितीत एकाच सिटी स्कॅन मशीनवर जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील आतील भागात असलेले सिटी स्कॅन मशीन दुरुस्तीसाठी जिल्हा रुग्णालयाने तातडीने पुढाकार घेऊन रुग्णांची होणारी गैरसोय टाळणे गरजेचे आहे.
सिटी स्कॅन मशीन दोन; परंतु उपयोगात एकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST