हिंगोली : कोरोना संकट काळात शहरातील अनेक पॅथाॅलाॅजी लॅबमध्ये विविध आजारांच्या संदर्भाने चाचण्या केल्या जात आहेत. परंतु, या चाचण्या महागड्या असल्याने रुग्ण तसेच नातेवाईकांना परवडणाऱ्या नाहीत, अशा प्रतिक्रिया काही रूग्ण व नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.
जिल्हा सामान्य रूग्णालय सेवेत असताना, रूग्ण आणि नातेवाईक महागड्या जागी जाऊन चाचण्या का करत आहेत? हाही यक्ष प्रश्न आहे. खरे पाहिले तर अँटिजन, आरटीपीसीआर, सीबीसी, डी-डायमर, एलएफटी, केएफटी या चाचण्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपलब्ध असून, रुग्णांनी मागणी केल्यास त्या करता येऊ शकतात, असे जिल्हा रुग्णालयाने सांगितले.
सीआरपी, डी-डायमर, एलएफटी, केएफटी या चाचण्यांच्या बाबतीत शहरातील पॅथाॅलाॅजीत बरीच तफावत आढळून येत आहे. कोरोना संकटात या महागड्या चाचण्या परवडणाऱ्या नसून, गरीब रुग्णांचे मात्र यात हाल होताना दिसून येत आहेत.
कोरोना महामारी परवडली; चाचण्या नको बाबा
कोरोना संकटात दर कमी करण्याऐवजी चाचण्यांचे दर वाढलेले आहेत. हे दर गरिबांना परवडणारे नाहीत. रुग्ण बरा व्हावा, घरात सुख नांदावे, हा मुख्य उद्देश ठेवून आम्ही महागड्या चाचण्या करुन घेत आहोत.
खरे पाहिले तर कोरोनासारख्या महामारीत लॅब चालकांनी चाचण्यांचे दर कमी करायला हवेत. परंतु, दर कमी करण्याऐवजी ते वाढवले आहेत. हे चाचण्यांचे दर न परवडणारे आहेत, अशी बोलकी प्रतिक्रिया काही रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. आम्ही यंत्रणेला दोष देण्याऐवजी आमच्या नशिबालाच दोष देत आहोत. चाचण्यांचे दर एवढे कसे काय वाढले? हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे. आधीच कोरोनामुळे जनता त्रस्त झालेली असताना चाचण्यांचा बाजार का मांडला गेला? हाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा प्रशासनाने दखल घेणे गरजेचे...
गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वचजण त्रस्त झालेले असताना चाचण्यांचा दर मात्र कमी होण्याचे नाव घेत नाही. आजाराचे निदान करुन घेण्यासाठी चाचण्या आवश्यक असतात, अशी भीती रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना घातली जाते. मग हा काय प्रकार आहे? हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे. महागाईने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत चाचण्यांसाठी लॅबचे दार ठोठवावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने चाचण्यांसंदर्भात विचारणा करणे गरजेचे आहे.