हिंगोली : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा वाढला असून, अवैध धंदेही खुलेआम सुरू आहेत. हे धंदे तत्काळ बंद करावेत, अशी मागणी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा खुलेआम सुरू आहे. वाळू माफिया वाळू उपसा करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करीत आहेत. अशीच स्थिती अवैध धंद्याची आहे. मटका जुगार खुलेआम सुरू आहे. दारू विक्रीही होत असून, लहान खेड्यातही दारू सहज उपलब्ध होत आहे. गल्लीबोळात मटका सुरू असल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अवैध वाळू उपशासह अवैध मटका, जुगार, दारू विक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे, अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.